माझी आई दप्तर आणायला गेली होती… मग कुठे गेली?” — सात वर्षांच्या गार्गीचा निरागस सवाल, पण दफ्तर आनायला गेलेली आई परतलीच नाही…



Purandar Reporter Live


📍 पुणे | प्रतिनिधी


                    “आई दप्तर घेऊन आली का?” – सात वर्षांच्या गार्गीने विचारलेला हा साधा प्रश्न, मात्र तो ऐकून संपूर्ण घरात अश्रूंचा बांध फुटला. सकाळी हसत निघालेली आई – दीपाली युवराज सोनी – संध्याकाळी थंड पडलेल्या मृतदेहाच्या रूपात परत आली.


बुधवारी सकाळी पुण्यातील गंगाधाम चौकात झालेल्या भीषण अपघातात दीपाली (वय २९) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या आपल्या सासऱ्यांसोबत दुचाकीवरून जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यांच्या सासऱ्यांना – जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) – गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


ही घटना सकाळी सुमारे ११ वाजता गंगाधाम चौकातील सिग्नलजवळ घडली. ट्रकच्या धडकेने दीपाली रस्त्यावर फेकल्या गेल्या व ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


आईच्या शेवटच्या मिठीची आठवण


घरातून निघताना दीपाली यांनी आपल्या सात वर्षांच्या मुलीला – गार्गीला – सांगितलं होतं, “तुझं दप्तर घेऊन येते गं…” त्या निरागस विश्वासाने गार्गी दिवसभर आईच्या वाटेकडे डोळे लावून बसली. मात्र जेव्हा संध्याकाळी आईचा मृतदेह घरी आला, तेव्हा तिच्या तोंडून निघालेला प्रश्न – “आई दप्तर घेऊन आली का?” – प्रत्येकाचं हृदय चिरून गेला.


तीन वर्षांचा विराज तर अजूनही आईच्या कुशीत झोपण्याची आस लावून बसतो. त्याला समजणारंही नाही, की आता ती कुशी कायमची हरवली आहे. एका क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यातून मायेची सावली उठून गेली.


ट्रकचालक अटकेत, प्रशासनाकडून उपाययोजनांची मागणी


या अपघातानंतर ट्रकचालक शौकतअली पापलाल कुलकुंडी (वय ५१) याला अटक करण्यात आली असून, ट्रक चालक व मालकाविरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी याप्रकरणी चिंता व्यक्त करत अवजड वाहनांना सकाळी शहरात प्रवेश बंदी असतानाही त्यांच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली आहे. त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.


Post a Comment

0 Comments